दृष्टी पल्याडची सृष्टी

   दृष्टी पल्याडची सृष्टी - एक प्रेरणादायी प्रवास.

 

            पावसाळा सुरु झाला आहे. पण यावर्षी कोरोनामुळे कुठल्याच  ऋतूचा हवा तसा आनंद घेता येत नाहीय..हिरवा निसर्ग ,बहरलेली वनराई, दूरपर्यंत पसलेली हिरवळ, काळ्या ढगांचे आकाशातले खेळ,रिमझिमणाऱ्या पावसाच्या सरी, रंगीबेरंगी फुलं, दुतर्फा झाडं असलेले रस्ते, अवतीभोवती ढगाळ वातावरणामुळे तयार झालेली सौम्य नैसर्गिक आभा, डोंगराळ भागांमध्ये दाटलेले धुके, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर कलकलाट करत चालेलला आणि मोहून टाकणारा पक्ष्यांचा थवा...निसर्गाने त्याच सगळं सुरळीत सुरु ठेवलंय. थांबलय ते फक्त माणसाच तांत्रिक आणि तितकंच खोट जीवन.

            क्षणभर विचार करा की, हा काळ असाच अजून काही वर्ष सुरु राहिला तर......? आणि हे चित्र अजून काही वर्ष डोळ्यांना दिसलच नाही तर...? अवघ्या चार ते पाच महिन्यात आपण कंटाळलो, थकलो, त्रस्त झालो, आणि चिडचिड वाढली. हो नां...? मग जरा विचार करा, एखाद्या व्यक्तीच आयुष्य इतरांप्रमाणे सुरळीत सुरु असतांना अचानक त्याला कळलं की, त्याचे डोळे आता कायमचे जाणार आहेत. पुन्हा तो परत हे जग, ही सृष्टी पाहू शकणार नाही..आणि यावर काहीच उपाय नाही...काय होत असेल तेव्हा त्याच? आतल्या आत त्याच्या मनात काय वादळ सूरु असेल ? एका क्षणात सगळं आयुष्य संपल्याची भावना त्याच्या मनात निर्माण होण स्वाभाविक आहे. समजावणारे अनेक भेटतील , सोबतीला अनेक राहतील , पण तो प्रवास त्याला आता एकट्यानेच करायचा असेल.

      पाच ज्ञानेन्द्रीयांपैकी डोळे हा अत्यंत महत्त्वाचा अवयव. डोळ्यांनीच सगळ्या भावना उत्कटपणे व्यक्त होतात. डोळे बोलतात, डोळे हसतात, डोळे रागवतात, डोळे उदास होतात, डोळे रडतात, डोळे तिरस्कार करतात, डोळे प्रेमही करतात. पहिल्यांदा जेव्हा डोळे उघडतात, तेव्हा एक प्रवास सुरु होतो, आणि शेवटी मिटतात तेव्हा  तो प्रवास थांबतो. डोळ्याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटत. जन्मताच डोळे नसले किंवा एखाद्या अपघाताने ते गेले तर जरा सहन करता येईलही पण सगळ सुरळीत सुरु असताना काही दिवसातच जर डोळे जाणार असे कळले तर कुठलीही व्यक्ती मानसिकरीत्या खचल्याशिवाय  राहणार नाही.पण काही लोकं याला अपवाद असतात. सकारात्मकतेच बाळकडू ते सोबतच घेऊन येतात. अश्या घटनांनी त्यांना दुःख होतच नाही असे नाही, पण ते बाजूला सारून ही लोकं स्वतःचही आयुष्य समृद्ध करतात आणि इतरांसाठी स्वतःला सज्ज करतात. दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा नवे मार्ग शोधून जगापुढे एक उदाहरण स्थापन करतात.

Prasad Gurav

 ऐन तरुणपणात दृष्टी गेली, पण जे आहे ते स्वीकारून खंबीरपणे स्वतःला सावरले. स्वतःसारख्या अनेक लोकांसाठी एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या आणि जगण्याची नवी उमेद देणाऱ्या प्रसाद गुरव यांचा हा जीवन प्रवास. सामान्य माणसालाही लाजवेल अशी जिद्द अशी उर्जा आपण त्यांना भेटल्यावर जाणवते. म्हणतात ना देव एखादी गोष्ट जेव्हा घेतो तेव्हा तो अनेक गोष्टी त्या बदल्यात देतो. पण त्याच ते देणं आपल्याला सकारात्मकपणे स्वीकार करता आला पाहिजे.

                प्रसादच बालपण मुंबईतलं. बालपणी प्रसादची दृष्टी उत्तम होती. त्यांना सगळ स्वच्छ दिसायचं. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ होता. ते क्रिकेट खेळायचे. मैदानी खेळ खेळायचे.अभ्यासातही प्रसाद उत्तम होते. या काळात त्यांना कधी कमी दिसणे किंवा किंवा अंधुक दिसणे असा त्रास नव्हताच. पण काही वर्षानंतर मात्र हळूहळू क्रिकेट खेळताना समोरून येणारा बॉल व्यवस्थित न दिसणे, कॅचेस चुकणे असे प्रकार व्हायचे. पण ही अगदीच सुरुवात होती. पण त्यांना नेमके कारण माहिती नव्हते,की हे असे नेमकं कशामुळे होतंय.

                     साधारण एकविसाव्या वर्षी जेव्हा प्रसाद इंजिनियरिंगसाठी कॉलेजला जायचे तेव्हा रात्री येताना बऱ्याचदा समोरून येणाऱ्या लोकांना ते धडकायचे. सुरुवातीला त्यांना वाटले कि हा रातआंधळेपणा (Night Blindness) असावा. म्हणुन त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा ठरवले. त्यासाठी ते के.इ.एम. हॉस्पिटलला गेले. पण डॉक्टरांनी त्यांना परत येण्यासाठी सांगितले. असे साधारण दोन तीनदा झाले. या दरम्यान डॉक्टर त्यांच्या सिनिअर डॉक्टरांशी चर्चा करायचे. आणि शेवटी जेव्हा प्रसाद परत डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्यांना एका डॉक्टरांनी त्यांच्या कार्डवर R.P. असे लिहिले.आणि सांगितले की, तुम्ही सहा महिन्यात आंधळे होणार आहात. ही गोष्ट प्रसादसाठी खूप धक्कादायक होती.कारण पुढच आयुष्य , त्यांची नोकरी, घरातले लोक , मित्र अश्या बऱ्याच गोष्टींचा विचार त्यांच्या पुढे होता. त्यांनी हि गोष्ट घरी किंवा इतर कुणालाही सांगितली नाही.पण या विषयावर संशोधन सुरु केल.

                     तंत्रज्ञान तेव्हा होत पण लोक इतके त्याबाद्दल जागरूक नव्हते.पण अश्यावेळी याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांनी आर.पी. म्हणजे काय ? हे गुगलच्या सहाय्याने शोधून काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या लक्षात आले की, भारतात या संदर्भात विशेष अशी माहिती देणार काहीच उपलब्ध नाही. पण आर.पी. म्हणजे Retinitis Pigmentosa इतके त्यांना कळले. रेटिनाइटिस पिग्मेंटोसा (आरपी) हा डोळ्यांचा अनुवांशिक विकार आहे ज्यामुळे दृष्टी कमी होते. रात्रीच्या वेळी पहायला त्रास होतो आणि डोळ्यांची परिघीय दृष्टी कमी होते. आणि नंतर दिवसापण दिसणे एकदमच कमी होते. असे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी स्वित्झर्लंडला आर. पी. साठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे तिथे संपर्क केला.

                  ख्रिस्तिना फ्रॅझर, स्वतः आर.पी. पेशंट असलेली ही, महिला त्याठिकाणी, आर. पी. पेशंटसाठी एक संस्था चालवते. त्यावेळी प्रसादने त्यांच्याशी संपर्क केला.त्यांनी प्रसादला यासंदर्भात बरेच मार्गदर्शन केले. नंतर परत जेव्हा प्रसाद दुसऱ्या डॉक्टरला भेटले तेव्हा त्यांनी प्रसादला सांगितले कि ते इतक्या लवकर आंधळे होणार नाहीत. त्यांच्याकडे अजून थोडा वेळ आहे . यानंतर प्रसादने  आर. पी. फ्रेंड्स इंडिया अस पत्रक तयार केल. ज्यामध्ये ते त्यांच्या आर.पी. च्या संशोधना बद्दल माहिती द्यायचे. तसेच संपूर्ण भारतातून फोन करणाऱ्या ,प्रत्यक्ष भेटायला येणाऱ्या पेशंटशी ते बोलायचे. चेन्नईच्या प्रसिद्ध शंकर नेत्रालायामध्ये येणाऱ्या आर.पी. पेशंटला प्रसाद यांच्याशी संपर्क करायला लावायचे. आणि प्रसाद तितक्याच सकारात्मकपणे सगळ्यांना पत्रांवारे मार्गदर्शन करायचे. तरुणांना त्यांच्या करिअरसाठी, जी लोक नोकरी करत असतील त्यांना, कम्प्युटरच्या माध्यमातून पुढे काम करता येईल असे मार्गदर्शनही प्रसाद करायचे,

                      हे सगळे करत असतांना प्रसादने आपले इंजिनियरिंग पूर्ण केले.त्यांना सिमेंसमध्ये चांगली नोकरीही मिळाली.हि नोकरी त्यांनी साधारण ५ वर्ष केली.नोकरीला असताना त्यांना बऱ्याचदा High Voltage प्लांट मध्ये काम करावे लागत होते.कमी दिसत असल्याने तिथे सेफ्टीचा प्रश्न होता. त्यांना कळले होते की, हे आता असेच सुरु ठेवणे शक्य नाहीय. याच दरम्यान त्यांना एक प्रोजेक्ट मिळाले. तेव्हा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना त्या प्रोजेक्टसाठी स्वतःची कंपनी सुरु करण्याचा सल्ला दिला. प्रसाद आणि त्यांच्या काही सहकार्यांनी ती नोकरी सोडून स्वतःची इ-जेनेटिक्स हि कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्यमातुन त्यांनी बरीच काम केली. त्यांच हे काम चांगल चाललं होत. इंडस्ट्रीयल ऑटोमेशन मध्ये या कंपनीच नाव चांगल झालं.

                                प्रसाद एक उत्तम आणि उत्साही ट्रेकर होते. त्यांनी अनेक गडकिल्ले, डोंगर, पर्वत, रॉक क्लाइम्बिंगने सर केले. ट्रेकिंग आणि निसर्गाशी एकरूप होणे त्यांना आवडते.त्यांनी लीड क्लाइम्बिंगही केलय. पण हे सगळ त्यावेळी बंद झाल होत..कारण त्यांचा डोळ्याचा त्रास. त्यात त्यांना घरून लग्नाला विचारणा व्हायला लागली होती. पण ते नकार द्यायचे. मला लग्नच करायच नाही असे सांगायचे. त्यांनी डोळ्यांबद्दल घरच्यांना सांगितले नव्हते.पण त्यांनी त्यांच्या जवळच्या काही मित्रांना सांगितले. कारण एकदा ते लघवीला जात असताना , त्यांना अचानक एका व्यक्तीने मागून जोराने हाक मारली.कारण त्यांचा पाय  दरीत गेला असता..त्यांना आपण अगदीच काठावर उभे आहोत हे कळलच नाही.म्हणून त्यांनी ट्रेकिंग आणि सगळे थांबवले. कारण आर.पी.मध्ये त्याच्या डोळ्याच्या आतील बुबुळाच्या दोन्ही बाजूच्या पेशी ह्या निकामी व्हायला सुरुवात झाली होती. त्यांना फक्त समोरचे थोडे दिसायचे. आपण आपल्या डोळ्यांनी जसे १८० डिग्रीच्या कोनात बघू शकतो तसे त्यांचे नव्हते. या कारणांनी त्यांना सगळे थांबवावे लागले.

                       प्रसाद आपल्या कामात खूप चोख होते. त्यामुळेच त्यांना त्यांच्या कामात चांगले यश मिळाले. त्यामुळे त्यांना आता लग्न करावे असे वाटू लागले. प्रसादच्या मावशीने आणलेल्या एका स्थळासाठी त्यांना विचारले गेले. पण ज्या व्यक्तीशी लग्न करायचे आहे, तिला या सगळ्याबद्दल सांगावे असे त्यांना वाटले. पूर्वाश्रमीच्या रुपाली घडीगावकर म्हणजेच आजच्या रुपाली गुरव.रुपाली जर्मनीला नोकरीला होत्या..त्यांचे वडील जेव्हा गेले तेव्हा, त्या कार्यासाठी त्या भारतात आल्या होत्या. तेव्हा प्रसाद आणि रुपाली यांची पहिली भेट झाली.त्यावेळी रुपाली यांना प्रसादच्या डोळ्याबद्दल काहीच जाणवले नाही, पण नंतर त्या जेव्हा परत जर्मनीला जायला निघाल्या तेव्हा प्रसादने त्यांना बोलावून घेतले. आणि सगळे सांगितले.पण रुपाली यांना त्याचे काहीच वाटले नाही. त्यांनी प्रसादला लग्नासाठी होकार दिला.आणि काही दिवसातच दोघांनीही लग्न केले. एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण आपले करतो.तेव्हा त्याचे सुख जसे आपले असते तसेच त्याचे दुःखही आपले असते या विचारसरणीची माणसं आता जरा कमीच पाहायला मिळतात.पण रुपाली यांनी तसे केले नाही,त्यांनी प्रसादला तेव्हाही भक्कम साथ दिली आणि आजही त्यांची साथ तशीच आहे. मुळात रुपाली म्हणतात, मी त्याला वेगळ कधी मानतच नाही. एखाद सामान्य जोडप जस राहत तस आम्ही राहतो.

Prasad , Rupali and vallari Gurav.

              आज रुपाली ह्या प्रसादच्या आयुष्याचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहेत. घरात प्रसादची आई आहे. मुलाचे डोळे गेले यासाठी त्यांना नक्कीच वाईट वाटत, पण त्यानंतर प्रसादने आणि रुपालीने परिस्थितीवर मात करत आज जे निर्माण केलय ते बघून समाधान नक्की वाटत. आणि त्याचसोबत आता त्यांची मुलगी वल्लरीही. ती आज ६ वर्षाची आहे. तिच्यासोबत प्रसादच्या अनेक सुंदर आठवणी आहेत. वल्लरीबद्दल सांगताना प्रसाद म्हणतात की, त्यांनी वल्लरीला फारतर ती एक वर्षाची झाली असेल तोपर्यंत पहिले. त्यानंतर  प्रसादची दृष्टी बरीच अंधुक झाली होती. वल्लरी आज सहा वर्षाची असली तरी प्रसादसाठी, त्यांनी तिला शेवटचे जे पहिले होते तशीच आहे. आणि ती कितीही मोठी झाली तरी त्यांच्या स्मृतीत तिचा तोच चेहरा असेल जो त्यांनी डोळे असताना पहिला होता. दोघेही घरात खेळतात, मस्ती करतात, गाणी गातात, नाचतात, मजा करतात. वल्लरी नवा ड्रेस , नवे कपडे घातले की, बाबांना तिने कुठल्या रंगाचा फ्रॉक घातलाय, कुठला ड्रेस घातलाय,त्यावर कशी डिझाईन आहे,त्यावर फुलं आहेत का हे सगळ सांगते. आणि हाताने स्पर्श करवून त्याचा भास देते. आज प्रसादच्या प्रत्येक कार्यात जश्या रुपाली आणि आई त्यांच्या सोबत असतात तशीच वल्लरीही असते. शेतात काम करणे, बाहेर फिरायला जाणे असो, ट्रेकिंग असो,किंवा खेळायला जाणे असो. प्रसादला आज दिसत नाही. पण त्यांचे ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग,शेतात काम करणे ,घरातली काम करणे, स्विमिंग, घरात कधीतरी अंड्याचे ऑम्लेट करणे, इतर काम करणे   अशी अनेक कामे सुरु असतात.

                       दृष्टी नसली तरी प्रसादला सिनेमा बघायला आवडतो. ते त्यासाठी घराजवळच्या थियेटरमध्ये जाऊन सर्वांसोबत सिनेमाचा आनंद घेतात. ऐकून सिनेमा समजून घेतात. रोज मॉर्निंग वॉकला जातात, संध्याकाळी फिरायला जातात. स्वतःचा फोन  स्वतः वापरातात. कधी बाहेर जायचे असल्यास स्वतः कॅब बुक करतात, आणि प्रवास करून परत घरी येतात. पण हे क्वचितच करावे लागते.कारण नेहमी ते सगळे सोबतच त्यांच्या कारने फिरायला जातात. त्यांचे कपडे, इतर साहित्य नेहमी तयारच असते. जायचे ठरले कि गाडी निघाली..तिघेही त्या प्रवासाला निघतात.रुपाली आणि प्रसादच्या बऱ्याच आवडीच्या गोष्टी सारख्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टीचा आनंद द्विगुणीत होतो.

                 वल्लरी प्रात्यक्षिकातून तीचं शिक्षण घेते. Homeschooling ने  तिला हव ते ज्ञान मिळत. तीचं , ती आनंदाने शिकते आणि सोबत आई बाबा असतातच. दरवर्षी कोकणातल्या गावात प्रसाद आणि रुपाली पुस्तकांच प्रदर्शन भरवतात. गावातल्या काही जिल्हा परिषदेच्या शाळेत हे पुस्तकांच प्रदर्शन भरतं. विद्यार्थ्यांना नवनवीन गरजेची पुस्तकं त्यात उपलब्ध करून दिली जातात. मुलांकडून अगदीच नाममात्र पैसे घेतले जातात. पण त्या पुस्तकांची उरलेल्या किमतीची रक्कम हे दोघे आणि त्यांचे काही सोबती मिळून जमा करतात. आणि ते प्रकाशकाला देतात.

          प्रसादचे डोळे जरी कमजोर झाले असले तरी इतर विचार आणि कार्यक्षमता मात्र कमजोर नाही.ते जितके स्वतःला Active ठेवतात तितकेच समाजासाठी काही करता येईल का याचेही भान त्यांना असते. तशीच बरीच वर्ष या मंडळीनी गरजू विद्यारर्थ्यांना Scholarship ही दिली. या सगळ्यात अत्यंत महत्त्वाची अशी आर्थिक बाजू सांभाळणेही गरजेचे होते.जेव्हा प्रसादचे डोळे जरा ठीक होते.तेव्हा प्रसादने, त्यांना पूर्ण भारत फिरण्याची इच्छा आहे असे पत्नीला सांगितले, कारण डोळे जायच्या आधी त्यांना या सगळ्या आठवणी आपल्या स्मृतीत जतन करून ठेवायच्या होत्या.पण या साठी आर्थिक व्यवस्थापन महत्वाचे होते. म्हणून तेव्हापासून त्यांनी गरजेच्या गोष्टीचे पैसे बाजूला काढून ठेवायला आणि इतर रक्कम यासाठी साठवायला सुरुवात केली. पण एवढ्यावर चालणार नव्हते.म्हणून आवश्यक नसलेल्या काही गरजा कमी केल्या.आणि एक सामान्य आयुष्यं जगायला सुरुवात केली.

Prasad Gurav and his frnds and team at Kilimajaro,South Africa

                प्रसादने बऱ्याच ठिकाणी सामाजिक कार्याताही हातभार लावला.लद्दाखमध्ये त्यांनी काही काळ घालवला. आणि याच सोबत अत्यंत गर्वाची बाब म्हणजे त्यांनी आणि त्यांच्या सारख्या अनेक मित्रांसोबत दक्षिण आफ्रिकेत असलेल्या किलीमंजारो इथला सर्वात उंच पर्वत ट्रेक करत सर केला. ही मोहिम त्यांनी त्यांचे मित्र दिव्यांशु गणात्रा निर्मित Adventures Beyond Barriers(ABBF) ह्या संस्थे मार्फत केली. दिव्यांशु हे सुद्धा आर.पी. पेशंट  आहे.  ते सुद्धा इथे प्रसादसोबत  होते.

                 अत्यंत कठीण आणि अतिशय उंच असा हा पर्वत होता विशिष्ट उंचीवर गेल्यावर जिथे प्राणवायू सुद्धा कमी मिळतो,अश्या ठिकाणी डोळे निकामी झाले असताना सुद्धा प्रसाद यांनी तो पर्वत त्यांच्या मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या मदतीने सर केला. सामान्य माणुससुद्धा तिथे जायला जरा विचारच करेल असा तो पर्वत होता. त्याठिकाणी या सगळ्यांनी आपल्या विजयाचा झेंडा रोवत एक विक्रमच स्थापित केलाय. तो क्षण प्रसाद आणि त्यांच्या मित्रांसाठी शब्दात वर्णन न करता येणारा होता.तिथे फक्त अश्रूच सगळ बोलू शकत होते. कारण डोळे नसले तरी आम्ही वेगळे नाही,आमचेही स्थान इतरांसारखेचआहे, तेव्हा आम्हाला प्रत्येक वेळी सहानुभूतीची गरज नाही हे सांगणारा तो गर्वाचा क्षण होता. 

      ABBF आयोजित मनाली ते खारदूंगला ह्या ५५० किमी खडतर मार्गावरील आणि Deccan Cliffhangerच्या पुणे गोवा ६५० किमी च्या टँडम सायक्लिंग मोहिमेत त्यांनी भाग घेतला आहे. तसेच टेकड्या आणि अनेक भागात प्रसादला ड्युअल सायकलिंग करण्याची  सुद्धा आवड आहे...ते नेहमी त्यात पुढे असतात.तसेच भारतातील २०,००० फुटी हिमशिखर, स्टोक कांगरीवर त्यांनी रुपाली आणि एका गाईडच्या मदतीने यशस्वी चढाई केली. त्यांच्या भारतभ्रमणादरम्यान लद्दाख, बंगाल आणि केरळमधल्या अंधांसोबत काम करणाऱ्या संस्थां बरोबर Volunteer केलं.

Prasad Gurav Cycling.

               

          रिकामं बसण्यापेक्षा स्वतःला कुठल्या तरी चांगल्या कामात स्वतःला  गुंतवून ठेवणे प्रसादला आवडते.सध्या ते जेंबे हे अफ्रिकन वाद्य शिकताहेत. त्यांना संगीताची आवड आहे, तेव्हा घरात भांडी घासायला मदत करताना किंवा कामं करताना ते आवडीची गाणी लावुन ही कामं करतात. डोळे गेले या एकाच गोष्टीचे दुःख आयुष्यभर बाळगत बसण्यापेक्षा आपले आयुष्य आनंदाने जगावे  आणि त्याच सोबत समाजासाठी निस्वार्थपणे जे करता येईल ते करावे अशी प्रसाद आणि रुपाली यांची भावना आहे. त्यासाठी ते नेहमी नवनवीन संकल्पना कश्या आणता येतील यावर काम करत असतात. त्यांच्या या कार्यात, जी लोक आधी त्यांच्यासोबत होती, ती आजही आहेत.सध्या प्रसाद आणि त्याची टीम एक सॉफ्टवेअर तयार करत आहे. ज्याच नाव आहे कम्युनिटी लर्निंग वेब .ज्यात सगळ्यांना फ्री आणि ओपन लर्निंग असेल. हा विचार खरतर स्तुत्यच आहे. आणि त्याचा नक्की सगळ्यांना उपयोग  होईल.

           आपल्याकडे सगळं असत तरी आपण सतत काही ना काही तक्रार करतच असतो. सतत एकमेकांना दोष देत असतो. जे नाही त्यामागे धावतो,पण जे आहे त्याकडे लक्षच देत नाही. तांत्रिक जगाच्या खोट्या गोष्टींना खर मानतो,पण हात पसरवून कवेत घेणाऱ्या सुंदर निसर्गाला दूर सारतो. एकमेकांशी जुळण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या असतीलही पण त्याच खऱ्या आहेत हे मानून आयुष्य त्याला अर्पण करतो.आणि शेवटच्या घटकेच्या वेळी जेव्हा उपरती होते तेव्हा मात्र कमी आयुष्य दिल्याची देवाकडे पुन्हा तक्रार करतो. प्रसाद हे त्यांच्यासारख्या लोकांसाठीच नाही तर आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी सुद्धा एक जीवंत उदाहरण आहे. की, जीवन कसे जगावे? आणि रुपालीही एक उदाहरणच आहे की, साथ कशी द्यावी? कारण जीवन जगण्यासाठी एकवेळ दृष्टी  नसली तरी चालेल पण 

चांगला दृष्टीकोन नक्की पाहिजे.

Prasad and Rupali Gurav

     

              

 

 

 

 

 

          

                 

 


       
                     

13 comments:

  1. Sach me Mr. Prasad ka jivan aur unki himmat hm sabhi ke lie Prerana hai. Aapke sabhi lekh mai padh chuki hu. Aap apne lekh se hamri mulakat mahan logo se karva rahe hai, jinse milna sachmuch saubhagya hi hai.

    ReplyDelete
  2. Waaa...Farach surekh.....Truely inspirational...

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर लेख 👍👌

    ReplyDelete
  4. शब्दमौन.... निरव शांतता... प्रसाद गुरव सरांना सलाम आणि तुझ्या लेखन कार्यासही सलाम

    ReplyDelete
  5. फार सुंदर लिहिलंय.रुपाली आणि प्रसाद यांचं सहजीवन आणि त्यांच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. खूप सदिच्छा त्या उत्साही सुह्रुदांना! आणि त्यांच्या कलाकार मुलीला वल्लरीला!!

    ReplyDelete
  6. Truely inspiring.. hats of to you Rupali and Prasad. Last line of this article touched my heart.. yes drushtikon mahatvhacha nahi tar tya drushti cha kay upyog.

    ReplyDelete
  7. Khupach sunder...very much Inspiring..hats of to both of u..

    ReplyDelete
  8. Prasad dada aani rupali tumha doghanahi hats off

    ReplyDelete
  9. khup sunder lekhan.. very inspiring.

    ReplyDelete
  10. Khupach sundar lekh.true inspiration.

    ReplyDelete
  11. अतिशय सुंदर सकारात्मक दृष्टिकोन.
    लवकरात लवकर आपण भेटुया.

    ReplyDelete
  12. प्रसाद यांचे खडतर जीवन, त्यांची मेहनत,जिद्द, चिकाटी यांनी त्यावर केलेली मात, कमाल आहे,रुपाली व वल्लरी ची उत्तम साथ, सामाजिक भान कौतुकास्पद
    त्यांना शुभेच्छा
    लेख अप्रतिम,फोटो सुंदर
    ज्योत्स्ना मुळावकर

    ReplyDelete
  13. जबरदस्त ! शतश नमन !

    ReplyDelete

Do not Post any Abusive Content or word or Spam Links in Comment Box.